वर्धा : मराठी शाळांकडे पालकांसह विद्यार्थ्यांचाही कल नसल्याने मराठी शाळा ओसाड पडल्या आहे.संबंधित विभागही कानाडोळा करीत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे वास्तव हिंगणघाट येथील नगरपालिकेच्या कमला नेहरु प्राथमिक शाळेतून पुढे आले. येथे ६८ लाख ४३६ हजार ४२ रुपयातून शाळेची इमारत बांधण्यात आली. दरमहा एक लाख रुपये खर्च हातो आणि पटसंख्या केवळ एक आहे. त्या विद्यार्थ्याचेही शाळेत मन रमत नसल्याने तोही दांडी मारत असल्याचेच चित्र आहे.
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्डमधील सरकारी दवाखान्याच्या मागे २०१४ मध्ये कमला नेहरु प्राथमिक शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली. या इमारतीकरिता तब्बल ६८ लाख ४३ हजार ६९२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झाली आहे. या शाळेत पहिली ते चवथी पर्यत वर्ग आहे पण; मराठी शाळांबद्दल असलेली उदासिनता आणि पटसंख्या वाढीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या शाळेत चारही वर्गांपैकी फक्त इयत्ता तिसरीमध्ये एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
त्याकरिता एक शिक्षक व शिपायी असे दोन कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनापोटी दरमहिन्याला जवळपास एक लाख रुपयांचा खर्च होत आहे. विशेषत: शाळेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थीही अमावश्या-पोर्णिमेलाचा शाळेत येत असल्याने कार्यरत शिक्षकांसह कर्मचाऱ्यांलाही हातावर हात ठेऊन बसण्याचेच वेतन मिळत असल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकाराबद्दल ना शाळेतील शिक्षकांनी कधी तक्रार केली ना पालिका प्रशासनाने लक्ष दिले, परिणामी शासनाचा मोठा निधी विनाकारण खर्ची जात असून विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव आता पुढे आले आहे.
यासंदर्भात तक्रारीही होऊ लागल्याने आता पालिका प्रशासन आता काय उपाययोजना करतात याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षकाचे समायोजन व विद्यार्थ्याला सोईच्या शाळेत प्रवेश द्या
हिंगणघाट येथील कमला नेहरु प्राथमिक शाळेतील पटसंख्येबाबत तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांनी शाळेला भेट देऊन वास्तविकता जाणून घेतली. तेव्हा त्यांना वर्ग १ ते ४ थी पर्यंतच्या वर्गात केवळ अमोल सुभाष पवार हा एकमेव विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले. या एका विद्यार्थ्यांकरिता लाख रुपयाचा खर्च होत असल्याने येथील शिक्षकाचे दुसºया शाळेत समायोजन करावे तसेच विद्यार्थ्याला दुसºया शाळेत प्रवेश देऊन याचा अहवाल हिंगणघाट पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिल्यात. सोबतच पोषण आहाराअंतर्गत २४.५०० किलो तांदूळ शिल्लक असल्याने यानंतर तांदूळ स्वीकारू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.