ताज्या बातम्या :-
काका, मला दररोज शाळेत येऊ द्या ना! – INM24
Connect with us

काका, मला दररोज शाळेत येऊ द्या ना!

राज्य

काका, मला दररोज शाळेत येऊ द्या ना!

यवतमाळ : एकीकडे पाण्यासारखा पैसा ओतून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी श्रीमंत मायबाप जिवाचा आटापिटा करीत आहेत. तर दुसरीकडे गरिबांच्या मुलांना इच्छा असूनही शाळेत जाण्याचा मार्ग सापडत नाही. तरीही दोन अर्धनागडी मुले थेट एका शिक्षकाच्या वर्गात येऊन धडकली अन् म्हणाली, ‘काका मला शाळेत येऊ द्या ना!’
आर्थिक परिस्थिती नाही, शाळेत जाण्याचे वयही नाही.. ही त्या दोन्ही मुलांची अवस्था. पण काहीही झाले तरी आम्ही शाळेत बसणारच, हा त्यांचा हट्ट. दोन-तीन वेळा शिक्षकांनी त्यांना समजावून परतही पाठविले. तरी या चिमुकल्यांनी शाळेचा लळा काही सोडला नाही. शेवटी, वय कमी असले, तरी त्यांना शाळेत घेतले. आता ते रोज पहिल्या वर्गात बसतात, हसतात, शिकतात..! शिवम बाळू कुरुडे आणि कृष्णा दत्ता पोटे अशी या शाळाभक्त चिमुकल्यांची नावे आहेत.
बालमनाची शिक्षणाची ओढ अधोरेखित करणारी ही घटना आहे पुसद तालुक्यातील मनसळ गावातली. या गावातली जिल्हा परिषद शाळा म्हणजे राज्यात ‘ज्ञानरचनावादाचा मनसळ पॅटर्न’ रूढ करणारे केंद्र ठरली आहे. परगावातील, परजिल्ह्यातील शिक्षकांनाही या शाळेची ओढ लागली आहे. मग गावातले चिमुकलेही साहजिकच या शाळेच्या प्रेमात पडले आहेत. पण याच गावातील शिवम नावाच्या चिमुकल्याला शाळेत येण्याची संधीच मिळत नव्हती.
काही दिवसांपूर्वी जूनमध्ये त्याने बाबाला घेऊन शाळा गाठली. शिक्षकांनी सांगितले, याचे वय कमी आहे, शाळेत घेता येत नाही, पुढच्या वर्षी या. वडील शिवमला परत घेऊन गेले. पण त्याची शिकण्याची आसक्ती काही त्याला स्वस्थ बसू देईना. तो काही दिवसांनी पुन्हा शाळेत आला. पण जमले नाही. पुन्हा दोन-तीनदा शाळेत आला, तरी वय कमी असल्याने त्याला शाळेत थारा मिळाला नाही. शेवटी सोमवारी तो त्याच्यासारखाच आणखी एक मित्र घेऊन आला.
विजय विश्वकर्मा हे ज्येष्ठ शिक्षक सोमवारी विद्यार्थ्यांचा परिपाठ घेत होते. त्याचवेळी शिवम आणि कृष्णा हे दोघेही संपूर्ण ‘तयारीनिशी’ थेट त्यांच्या वर्गातच धडकले. शिक्षकांनी त्यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा एकच हट्ट कायम होता, ‘काका आम्ही शाळेत येतोच!’ शेवटी त्यांना शाळेत घेण्यात आले. सोमवारी ते शाळेत आले तेव्हा अंगात फक्त पँट होता. दुसºया दिवशी शिक्षक विश्वकर्मा यांनी बाजारातून त्यांच्यासाठी दोन गणवेश आणले. मुलं शाळेत आल्यावर स्वत:च त्यांना गणवेश घालून दिले. आता पाच दिवसांपासून ते रोज शाळेत येत आहेत. शिक्षणाची ही ओढ, त्यांना पुढे कुठे घेऊन जाईल हे वेगळे सांगण्याची गरज आहे का?

आईबाबांना न आणता मिळविली अ‍ॅडमिशन!
कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतानाही अनेक तरुणांना कुणाला तरी सोबत नेण्याची गरज भासते. पण शिवम आणि कृष्णा या पाच वर्षांच्या चिमुकल्यांनी आपल्या पहिल्या वर्गाच्या अ‍ॅडमिशनसाठी एकट्यानेच शाळा गाठली. वयात बसत नसतानाही शिक्षकांपुढे हट्ट धरून आपली अ‍ॅडमिशनही करवून घेतली. पोरांची ही आसक्ती बघता जिल्हा परिषदेने अंगणवाड्या आणि शाळा एकाच परिसरात आणि एकाच वेळेत भरविण्याची गरज आहे.

बाबा गेले मजुरीला, मुले आले शाळेला
ही दोन्ही मुलं मागासवर्गातील आहेत. शिवमचे आईवडील दोघेही उसतोडीच्या मजुरीसाठी परजिल्ह्यात गेले आहेत. शिवम सध्या गावात आजोबाकडे राहतो. तर कृष्णाचे वडील सायकलवर भाजीपाल्याचे टोपले बांधून परगावी विक्रीसाठी जातात. ही दोन्ही मुलं आता जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षित वातावरणात आली आहेत.

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top